मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राधान्य देण्यासाठी समितीची स्थापना

•गृह, नगरविकास आणि सांस्कृतिक विभागांचा समावेश; मराठी चित्रपटसृष्टीला दिलासा
मुंबई :- मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या अपुऱ्या संधी आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीमध्ये विविध सरकारी विभागांच्या सचिवांसह मराठी चित्रपट निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश असेल. ही समिती येत्या दीड महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना कमी स्क्रीन मिळणे, अचानक खेळांच्या वेळा बदलणे किंवा चित्रपट काढून टाकणे, आणि सेन्सॉर बोर्डाकडून होणारा विलंब यांसारख्या अनेक प्रश्नांवर मराठी चित्रपट निर्माते आणि वितरकांनी शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.


या समितीचे अध्यक्ष गृह विभागाचे अपर मुख्य सचिव असतील. त्यांच्यासोबत गृह, नगरविकास, सांस्कृतिक कार्य, आणि परिवहन विभागाचे सचिव, तसेच चित्रपट महामंडळाचे आणि निर्माते महामंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या समितीच्या अहवालाच्या आधारावर सरकार अंतिम निर्णय घेईल, ज्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.


