मुंबई

Samana Agralekh : ‘सामना’चा सरकारवर थेट हल्ला: “जातीय सलोखा बिघडवणारे सरकारमध्येच”

•यवतच्या दंगलीवरून भाजप आणि अजित पवार गटावर गंभीर आरोप; बाहेरील आमदारांनीच परिस्थिती चिघळवल्याचा दावा

मुंबई :- दौंड तालुक्यातील यवत येथे व्हॉट्सॲपवरील एका वादग्रस्त स्टेटसवरून उसळलेल्या धार्मिक दंगलीला सरकारनेच खतपाणी घातल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारमधील काही व्यक्तीच महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवत असल्याचा थेट दावा करत भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सामना वृत्तपत्रांच्या अग्रलेखात म्हटले आहे की, यवत येथील दंगल एका तरुणाने ठेवलेल्या स्टेटसमुळे सुरू झाली असली तरी, बाहेरून आलेल्या दोन आमदारांनी परिस्थिती आणखी चिघळवली. या आमदारांमुळेच दंगलीला अधिक गंभीर स्वरूप आले, असा ‘सामना’चा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर दिलेल्या प्रतिक्रिया ‘चकित’ करणाऱ्या असल्याचेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

अजित पवार गटाचे आमदार जगताप आणि भाजपचे आमदार पडळकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “हे आमदार यवतमध्ये आले आणि त्यांनी लोकांना जास्तच भडकवले. त्यामुळेच दंगल उसळली,” असा आरोप करत ‘सामना’ने म्हटले आहे की, “दंगल घडवणाऱ्या बाहेरील व्यक्ती या सरकार पक्षाच्याच आहेत. तणाव वाढावा आणि दंगा पेटवावा म्हणूनच या व्यक्तींनी यवतमध्ये प्रवेश केला होता.” महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार नसल्यामुळे ते धार्मिक मुद्द्यांवर लगेच रस्त्यावर उतरतात, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही यात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतच्या घटनेची माहिती घेतली असल्याचे सांगत, ‘काही लोक जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यासाठी असे स्टेटस ठेवतात,’ असे म्हटले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे,’ असे सांगत जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. यावर ‘सामना’ने प्रश्न विचारला आहे की, “जर हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर दंगे कोण भडकवत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.” शांतता भंग करण्याचे काम करणारे सरकारमध्येच आहेत, असा आरोप करत ‘सामना’ने सरकारवर चौफेर टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0