मुंबई

Rohit Pawar : ‘रमी’ खेळणाऱ्या कोकाटेंना क्रीडा खातं, रोहित पवारांचा महायुतीला थेट इशारा!

•’खातेबदल केला म्हणजे सुटलो असं समजू नका’; राष्ट्रवादीकडून कोकाटेंवर ‘रमी’राव म्हणून खोचक टीका

मुंबई: विधिमंडळात ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून, आता त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खातेबदलावर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून, व्हिडीओ समोर आणणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “सरकारने केवळ खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करू नये.” कोणत्याही मंत्र्याने असंवेदनशीलपणे वागल्यास तो महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा खाते आल्याने, त्यांनी भूतकाळातील चुका टाळून या खात्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार यांनी, आपल्यासह पक्षाचे संपूर्ण सरकारवर लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून माणिकराव कोकाटे यांना खोचक टोला लगावण्यात आला आहे. “महायुतीमधील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,” असे म्हणत, त्यांनी कोकाटे यांना ‘रमी’राव या नावाने संबोधत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा खातेबदल म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी असून, मंत्र्यांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा जपली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असाच अप्रत्यक्ष संदेश रोहित पवार यांच्या या भूमिकेतून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0