IND Vs ENG : मँचेस्टर कसोटी ड्रॉ! जडेचा-सुंदरच्या ऐतिहासिक भागीदारीने भारताला वाचवले!

•पहिल्या डावात 311 धावांची मोठी पिछाडी भरून काढत भारताची झुंज; गिलचे शतक, राहुलचे 90
IND Vs ENG 4th test match :- थरारक मँचेस्टर कसोटी अखेर अनिर्णित राहिली. इंग्लंडने दिलेल्या 311 धावांच्या मोठ्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारताने जबरदस्त झुंज देत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. रवींद्र जडेजा (107 धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (101 धावा) यांच्या पाचव्या विकेटसाठीच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीने भारताला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले आणि क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताचा पहिला डाव 358 धावांवर आटोपला. यामध्ये साई सुदर्शन (61), यशस्वी जैस्वाल (58) ऋषभ पंत (54), के.एल. राहुल (46), शार्दुल ठाकूर (41) आणि वॉशिंग्टन सुंदर (27) यांनी उपयुक्त योगदान दिले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करत 5 बळी घेतले.
इंग्लंडने पहिल्या डावात भक्कम 669 धावांचा डोंगर रचत भारतावर 311 धावांची मोठी आघाडी घेतली. इंग्लंडकडून जो रूटने 150 धावा आणि कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची शानदार शतकी खेळी केली.
पहिल्या डावातील मोठ्या पिछाडीनंतर भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघेही शून्यावर बाद झाल्याने भारतावर पराभवाचे सावट होते. मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि के.एल. राहुल यांनी जबरदस्त झुंज दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत इंग्लंडला अडचणीत टाकले. राहुलने 230 चेंडूत संयमी 90 धावांची खेळी केली, तर गिलने शानदार शतकी खेळी करत 103 धावा फटकावल्या.
यानंतर, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मैदानावर पाय रोवले. अत्यंत संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजी करत त्यांनी भारताला पराभवापासून वाचवले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची अभेद्य भागीदारी रचली. जडेजा 107 धावांवर आणि सुंदर 101 धावांवर नाबाद राहिल्याने अखेर हा सामना ड्रॉ राहिला. इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा अष्टपैलू खेळ (5 बळी आणि 141 धावा) लक्षवेधी ठरला असला तरी, भारताच्या तळातील फलंदाजांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद ठरला.



