Maharashtra News : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे ‘राज’कीय सरप्राईज; युतीच्या आशा पुन्हा पल्लवित

Raj Thackeray And Uddhav Thackeray :,ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व!मातोश्रीवर 20 मिनिटांची दिलखुलास चर्चा
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात काल (27 जुलै) एक अशी घटना घडली, जी भविष्यात इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंदवली जाईल. ‘म’ मराठीचा की ‘म’ महापालिकेचा या चर्चेत, कालचा ‘म’ मात्र मातोश्रीचा ठरला! मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray Birthday यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अचानक मातोश्रीवर भेट दिली. या भेटीने केवळ राजकीय वर्तुळालाच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेलाही धक्का बसला. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे अनपेक्षित सरप्राईज मिळाले, तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता ही पालवी युतीची मुळे धरणार की पुन्हा कोमेजून जाणार, याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांच्या खोलीत जुन्या आठवणींना उजाळा
दैनिक ‘सामना’च्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना गुलाबांचा बुके देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन, त्यांच्या आसनासमोर दोन्ही बंधूंनी नतमस्तक होत आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही दिलखुलास चर्चा झाली. सुमारे 20 मिनिटे राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते आणि या काळात दोन्ही बंधूंमध्ये अत्यंत खेळीमेळीचे आणि सकारात्मक वातावरण होते. राज ठाकरे बाहेर पडताना, उद्धव ठाकरे स्वतः त्यांना निरोप देण्यासाठी दारापर्यंत आले. सगळ्यांना हात उंचावून अभिवादन करत राज ठाकरे शिवतीर्थाकडे परतले.
अनपेक्षित भेटीचा योग जुळला असा
राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येतील, याची कल्पना कोणालाही नव्हती. ठाकरे गटातील कुणीही तशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, काल सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना संपर्क साधला आणि आपण उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत असल्याचे कळवले. संजय राऊत यांनी तात्काळ ही माहिती उद्धव ठाकरेंना दिली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच राज ठाकरे आपल्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानावरून मातोश्रीवर पोहोचले. या भेटीने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता निर्माण केली आहे. येणारा काळच या ऐतिहासिक भेटीचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे स्पष्ट करेल.


