महाराष्ट्र
Trending

Manikrao Kokate : रमी प्रकरणाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी कृषिमंत्र्यांची शनीचरणी धाव!

Manikrao Kokate Latest News : राजकीय साडेसाती दूर करण्यासाठी कोकाटे शनिमांडळ येथील प्रसिद्ध मंदिरात, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात उपस्थिती.

नंदुरबार: रमी चित्रफित प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate सध्या आपल्या कारकिर्दीला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी देवदर्शनाच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांनी साडेसातीमुक्तीचे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात विशेष पूजा आणि आरती करत शनिदेवाला साकडे घातले. येत्या मंगळवारी त्यांच्या कृषीमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार निर्णय घेणार असल्याने, कोकाटे यांची ही शनिदर्शन यात्रा लक्षवेधी ठरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनविश्वास सप्ताह’ अंतर्गत शनिमांडळ येथे कांतालक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी या शिबिराला आवर्जून भेट दिली. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील नियोजित कार्यक्रम रद्द करून कोकाटे शुक्रवारीच दुपारी चार वाजता नंदुरबारमध्ये दाखल झाले, ज्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारीही काहीसे चकित झाले.

शनिवारी सकाळी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता कोकाटे यांनी बोलणे टाळले आणि ते थेट शनिमांडळ येथील आरोग्य शिबिरासाठी रवाना झाले. तिथे पोहोचताच, त्यांनी सर्वप्रथम गावातील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन मनोभावे पूजा आणि आरती केली. कृषीमंत्रीपद स्वीकारल्यापासून त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट आणि त्यात रमी प्रकरणाची झालेली भर यामुळे ते अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शनिदेवाला साकडे घातल्याचे बोलले जात आहे.

यावेळी आरोग्य शिबिराच्या व्यासपीठावरून बोलताना कोकाटे यांनी, राज्यातील सहकारी मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या स्थितीत दिलासा देण्याची गरज व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच, शनिमांडळच्या सरपंचांनी वळवाच्या पावसामुळे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याचे निदर्शनास आणले. यावेळी कोकाटे यांनी शनिदेवाला प्रार्थना करताना “शनैश्वर महाराजांना दुष्काळ निवारण होवो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो, आपल्याला चांगले दिवस प्राप्त होवो, तसेच आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत,” अशी कबुली दिली.

राजकीय क्षेत्रात संकट आल्यावर अनेक नेते देवाकडे धाव घेताना दिसतात. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश असून, आता या पंगतीत कृषिमंत्री कोकाटे यांचीही भर पडली आहे. त्यांच्या या देवदर्शनाने त्यांची राजकीय साडेसाती खरंच दूर होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0