Khadse Vs Mahajan : ‘हनी ट्रॅप’च्या वादळात खडसे-महाजन आमने-सामने: ‘गुलाबी गप्पां’वरून राजकीय धुमाकूळ!

- लोढा प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; जलसंपदा मंत्र्यांच्या फोटो पोस्टवर खडसेंचा पलटवार
मुंबई :- ‘हनी ट्रॅप’ आणि अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये चर्चेत आलेल्या प्रफुल्ल लोढा या व्यक्तीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार सत्र सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत असताना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतचे प्रफुल्ल लोढाचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. “एकनाथ खडसे… तुमच्या या ‘गुलाबी गप्पा’ कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय,” अशा आशयाची पोस्ट करत महाजन यांनी खडसेंना लक्ष्य केले.
महाजनांच्या या पोस्टवर एकनाथ खडसे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले असून, महाजनांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या या वादात खडसे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच्या गोष्टी तो मला सांगत होता,” असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले.
खडसेंकडून महाजनांच्या चौकशीची मागणी
यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या चौकशीची मागणी करत आपले जुने हिशेब चुक्ते केले. “माझं आता गुलाबी गप्पा मारण्याचं वय राहिलं नाही. मात्र, तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्याची माहिती मला मिळत होती,” असा दावा खडसे यांनी केला. ते पुढे म्हणाले, “तुम्ही आज जिथे आहात ते केवळ फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याइतकी देखील राहिली नसती. माझ्या पाच चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी. तुम्हाला चालेल का, तेवढा दम तुमच्यात आहे का?” असा थेट सवाल खडसेंनी महाजनांना विचारला.
या संपूर्ण प्रकरणात एकनाथ खडसे भाजपमधील आपल्या प्रवासाचा आणि पक्षाकडून झालेल्या हेटाळणीचा उल्लेख करत भावनिक झाले. “मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत ते लोक पक्षात आहेत आणि आम्ही बाहेर फेकले गेलो आहोत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाजन यांनीच आपल्याला मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला, असा गंभीर आरोपही खडसे यांनी केला. “मी मंत्रिमंडळात होतो तोवर महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये खडसेंना लोढाला उद्देशून ‘दारुडा’ म्हटल्याची आठवण करून दिली. “हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हा तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे,” असे महाजन यांनी म्हटले होते. यावर खडसे म्हणाले की, 2019 ते 2022 दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर असंख्य आरोप करण्यात आले, पण प्रत्येक चौकशीतून ते निर्दोष सिद्ध झाले आहेत. आता ज्या लोढाला स्वतः महाजन ‘दारुडा’ म्हणतात, त्याच लोढाचा आधार घेऊन महाजन बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार खडसेंनी केला आहे.


