नाशिक

Shirdi Sai Mandir Bomb Threat : शिर्डीच्या साई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी!

•’भगवंत मान’ नावाच्या ईमेल आयडीवरून धमकी; शिर्डीत कडेकोट बंदोबस्त, तपास युद्धपातळीवर सुरु!

नाशिक, शिर्डी :- देशातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे ही धमकी दिली असून, त्यात साईबाबांच्या समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटके ठेवल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली असून, मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत कसून तपासणी सुरू केली आहे.

शिर्डीचे साईबाबा मंदिर हे केवळ देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही येणाऱ्या भाविकांचे एक प्रमुख श्रद्धाकेंद्र आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने, मंदिराच्या सुरक्षेची नेहमीच चोख व्यवस्था असते. दर्शन रांगेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक भाविकाची कठोर तपासणी केली जाते. अशा परिस्थितीत मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने भाविकांमध्ये आणि प्रशासनातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

bhagvanthmann@yandex.com” या ईमेल आयडीवरून भगवंत मान नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. धमकीचा ई-मेल साईबाबा मंदिर ट्रस्टला प्राप्त होताच, ट्रस्टने तातडीने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये बॉम्ब पेरल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, धमकी देणारा कोण आहे आणि ही धमकी खरी आहे की केवळ खोडसाळपणा आहे, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसर पोलिसांनी अक्षरशः पिंजून काढला आहे. साईबाबा संस्थानकडूनही साईभक्तांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे साईधाम शिर्डीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण असले तरी, पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0