Dombivli MIDC News : डोंबिवली MIDC मध्ये अग्नितांडव! दोन कंपन्यांना भीषण आग, कर्मचाऱ्यांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Dombivli MIDC Fire News : विश्वनाथ गारमेंट आणि एरोसेल कंपन्यांना भीषण आग; अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी
डोंबिवली :- डोंबिवली एमआयडीसी परिसर आज दुपारच्या सुमारास आगीच्या भीषण घटनेने हादरला. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या दोन कंपन्यांना लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते, तर आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. Dombivli MIDC Fire News
दुपारी अचानक विश्वनाथ गारमेंट कंपनीत आग लागली आणि काही वेळातच ती बाजूच्या एरोसेल कंपनीपर्यंत पसरली. आगीची तीव्रता इतकी होती की, काही क्षणातच दोन्ही कंपन्यांना कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस यंत्रणाही तातडीने मदतीसाठी धावली.
आग लागलेल्या कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने, अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली आणि तिचे कारण काय, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील इतर कंपन्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


