Maharashtra Governor CP Radhakrishnan : “भाषेच्या नावावर द्वेष पसरवू नका!” — राज्यपाल राधाकृष्णन यांचे भावनिक आवाहन

Marathi Language Row : “मातृभाषेचा अभिमान ठेवा, पण इतर भाषा शिका” — वैयक्तिक अनुभव सांगत दिला दिलासादायक संदेश
मुंबई :- मराठी आणि हिंदी भाषेवरून महाराष्ट्रात वाढत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन Maharashtra Governor CP Radhakrishnan यांनी प्रथमच भूमिका मांडली आहे. त्यांनी भाषेच्या आधारावर द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, अशा मानसिकतेमुळे राज्याचं दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं, असा इशाराही दिला.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “मला हिंदी समजत नाही, आणि त्यामुळेच मला वाटतं की आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर ठेवा, पण त्याचबरोबर इतर भाषांप्रती आदर आणि समजही आवश्यक आहे.”
आपल्या खासदारकीच्या काळातील अनुभव कथन करताना ते म्हणाले की, “तामिळनाडूमध्ये मी एका घटनेचा साक्षीदार होतो, जिथे काही स्थानिक लोक एका व्यक्तीला फक्त त्याला तमिळ भाषा येत नसल्यामुळे मारहाण करत होते. अशा भाषिक द्वेषामुळे सामाजिक समरसतेला तडे जातात.”
“जर आपण द्वेष निर्माण करू लागलो, तर गुंतवणूकदार कोणत्या वातावरणात येतील? अशा वर्तनाचा परिणाम राज्याच्या विकासावर होतो. दीर्घकाळात आपण आपलेच नुकसान करून घेतो,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून वाद वाढला होता. या निर्णयाला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचा तीव्र विरोध होता. विरोधी पक्षांनी या निर्णयावर राज्य सरकारला जाब विचारला आणि संताप व्यक्त केला. परिणामी, सरकारने हा निर्णय तूर्तास मागे घेतला असला तरी भाषेवरील राजकारण अद्याप शांत झालेले नाही.
राज्यपालांच्या हस्तक्षेपाला राजकीय वर्तुळात महत्त्व
राज्यपालांनी भाषिक सलोख्याबाबत दिलेला संदेश राजकीय तापलेल्या वातावरणात एका समजूतदार पदाधिकाऱ्याचा आवाज ठरत आहे. त्यांच्या विधानामुळे भाषिक वादाच्या मुद्द्यावर एका संतुलित दृष्टिकोनाची गरज अधोरेखित झाली आहे.


