Vice President Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपतींचा राजीनामा, संसदेत गोंधळ – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही

•पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरून दोन्ही सभागृहांत विरोधकांचा आक्रमक पवित्रा
ANI :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असताना राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आज राज्यसभेत ते अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या जागी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहाचे कामकाज चालवले.
दुसरीकडे, पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर विरोधकांनी आज सकाळपासूनच आक्रमक भूमिका घेतली. कामकाज सुरु होताच गोंधळ उडवला गेला आणि घोषणाबाजीने दोन्ही सभागृहे दणाणून गेली. परिणामी, लोकसभा आणि राज्यसभा दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या. सोमवारीही असाच गोंधळ पाहायला मिळाला होता, जेव्हा लोकसभा तब्बल 4 वेळा तहकूब झाली होती.
दिवसाच्या सुरुवातीस संसद भवनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्याचवेळी आय.एन.डी.आय.ए. आघाडीच्या नेत्यांनीही स्वतंत्र बैठक घेतली.
धनखड यांनी कालच अध्यक्षपदावरून भाषण केल्यानंतर राजीनामा सादर केला होता. त्यांच्या निर्णयामुळे संसद आणि सत्ताकेंद्रात चर्चेला उधाण आलं असून आगामी दिवसांत राष्ट्रपती भवनातील हालचालींवर सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.


