Ajit Pawar : ‘एक ट्विट, आणि सूरज चव्हाण गेले!’; छावा प्रकरणानंतर अजित पवारांचा कठोर निर्णय

•मराठा संघटनांचा वाढता दबाव; अजित पवारांचे थेट ट्विटर आदेश आणि सूरज चव्हाण यांची पदावरून उचलबांगडी
मुंबई | लातूरमधील ‘छावा’ कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. मराठा संघटनांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी थेट ट्विटरवरुनच सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशाची सार्वजनिक आणि थेट स्वरूपातील तीव्रता हेच दर्शवते की, पक्ष आता ‘हिंसक वर्तन’ अजिबात खपवून घेणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
सुरुवातीला सूरज चव्हाण यांनी बोट फ्रॅक्चर असल्याचे कारण देत अजित पवारांची भेट टाळली आणि लातूरमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र यामागे कारवाईपासून वेळ घेण्याचा प्रयत्न होता का, असा संशय उपस्थित झाला. दरम्यान, अजित पवार यांनी सकाळी 12.11 वाजता पहिलं ट्विट करत, लातूर घटनेचा निषेध केला आणि चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्याची सूचना केली.
पण त्या ट्विटनंतरही चव्हाण यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, अजित पवार यांनी 12.59 वाजता दुसरं ट्विट करत सूरज चव्हाण यांना स्पष्टपणे “तातडीने पदाचा राजीनामा द्या” असा आदेश दिला. हे ट्विट येताच, सूरज चव्हाण यांच्यासमोरील पर्याय संपले आणि नाइलाजाने का होईना, त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.या संपूर्ण प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या मूल्यांशी विसंगत वर्तनावर तातडीने कठोर पाऊल उचलण्याचा संदेश दिला आहे. पक्षात राहून असभ्य वर्तन, हिंसाचार यांना माफी नाही, हेच स्पष्ट झालं आहे.



