Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Latest Rain Update : घाटकोपर, अंधेरी, दादर, पवईसह अनेक भागांत पावसाचा जोर
मुंबई | काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सून पावसाने रविवारी पुन्हा मुंबईत दमदार पुनरागमन केलं. सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस आज पहाटेपासून अधिकच जोर धरू लागला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागात पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. Mumbai Latest Rain Update
अंधेरी, घाटकोपर, पवई, दादर, वरळी, प्रभादेवी आदी उपनगरांमध्ये सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर दिवसभर कायम राहण्याची शक्यता असून, सखल भागांत पाणी साचण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
पावसाने घेतलेली उशिरा गती
यंदा मान्सून लवकर दाखल झाला असला तरी जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत पावसाने दडी मारल्याने अनेक भाग कोरडेच राहिले होते. मुंबईतही पहिल्या काही आठवड्यांत फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र रविवारीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 ते 20 जुलै दरम्यान कुलाबा वेधशाळेत 142.8 मिमी तर सांताक्रूझ वेधशाळेत 283.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही मात्रा जुलैच्या सरासरीपेक्षा बरीच कमी आहे.
राज्यभर पावसाची चिन्हं, यलो अलर्ट जारी
राज्याच्या इतर भागातही आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुसळधार पाऊस (यलो अलर्ट): रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, लातूर, नांदेड
विजांच्या कडकडाटासह पाऊस: मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, विदर्भ
अन्य भागांमध्ये: हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज
दक्षिण कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यादरम्यान पूर्व-पश्चिम दिशेने वाऱ्यांचे संमेलन सुरू असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येतो आहे. तसेच पश्चिम राजस्थानात सक्रिय असलेली कमी दाबाची प्रणाली आणि उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या प्रणालीमुळे आगामी काही दिवस राज्यभर चांगला पाऊस अपेक्षित आहे.


