Mumbai Bus Fire News : फोर्ट परिसरात बेस्टच्या बसला अचानक आग! जीवितहानी टळली, बस जळून खाक

Mumbai Bus Fire News : बॅटरीजवळ लागलेल्या आगीने घेतला रौद्ररूप; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना
मुंबई | मुंबईतील फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बेस्टच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच बसचा समोरील भाग जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसान झाले असून, ही बस भाडेतत्त्वावर चालवली जात होती.
मार्ग क्रमांक ए-138 ची ही स्विच दुमजली बस सकाळी बॅकबे डेपोकडे जात असताना, सिद्धार्थ महाविद्यालयाजवळील सिग्नलला थांबलेली असताना सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचा केंद्रबिंदू समोरच्या डाव्या चाकाजवळील हाय व्होल्टेज बॅटरी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
वाहकाने प्रसंगावधान राखून तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
बेस्ट उपक्रमाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास तांत्रिक पातळीवर सुरू आहे. सतत घडणाऱ्या अशा घटना बेस्टच्या बस सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.


