Pune GoodLuck Cafe : गुडलक कॅफेला ‘काचेला’ खोडा! प्रसिद्ध कॅफेचा परवाना एफडीएने केला निलंबित

FDA Take Action On Good Luck Cafe : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई,हॉटेल मालकाने ‘दुरुस्ती सुरू आहे’ असा फलक लावून बंदचा संकेत दिला
पुणे :- पुण्याच्या खाद्यनकाशावर खास ओळख असलेल्या गुडलक कॅफेला सध्या टाळं ठोकण्यात आलं आहे.Pune Good Luck Cafe बन मस्क्यात काचेचा तुकडा आढळल्याच्या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केल्याची माहिती आहे. मात्र, हॉटेलच्या प्रवेशद्वारावर ‘दुरुस्तीचे काम सुरू आहे’ असा फलक लावून कॅफे बंद ठेवण्यात आल्याचे हॉटेल मालकाकडून सांगण्यात येत आहे. Pune Latest News
हा सर्व प्रकार उजेडात आला तो एका व्हायरल व्हिडिओमुळे. तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने फिरू लागला. त्यात एका जोडप्याने गुडलकमध्ये बसून बन मस्का मागवला आणि त्यामध्ये काचेचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक अनुभव त्यांनी शेअर केला.
तपासणीदरम्यान अस्वच्छतेचे धक्कादायक प्रकार
व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एफडीएने कॅफेची तपासणी केली असता स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी उघड झाल्या. या त्रुटींमुळेच प्रशासनाने परवाना तातडीने निलंबित केला. यामुळे एकेकाळी गर्दीने फुलून जाणाऱ्या गुडलक कॅफेच्या प्रवेशद्वारावर सध्या शांततेची झाक पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यातील ‘आयकॉनिक स्पॉट’ मानला जाणारा गुडलक कॅफे बन मस्का, इराणी चहा आणि खास पारंपरिक चवीनं प्रसिद्ध होता. मात्र, या घटनेनंतर ग्राहकांमध्ये रोष असून, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
“जे ठिकाण इतकं वर्षं विश्वासाचं होतं, तिथे असं काही घडणं धक्कादायक आहे”, अशी भावना अनेक ग्राहक व्यक्त करत आहेत



