मुंबई

Mira Bhayandar Crime News : 30 गुन्ह्यांचा कर्दनकाळ अखेर गजाआड!

•खून, खंडणी, बेकायदेशीर शस्त्रसाठा, चोऱ्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या इब्राहीमला अटक; विविध राज्यात अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित

मिरा-भाईंदर | राज्यातील व देशातील विविध पोलीस दलांना डोकेदुखी ठरलेला एक अंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अखेर काशिमीरा गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व रात्रीच्या घरफोड्यांसारख्या तब्बल 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या मोहम्मद इब्राहीम मोहम्मद सईद (39 वय, रा. उत्तन, भाईंदर पूर्व) याला पोलिसांनी 7 जुलै रोजी अटक केली.

गुजरातमधील वलसाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एका आलिशान स्कोडा रॅपिड कारसह घरफोडी करत मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. या प्रकरणी वलसाड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 331(4), 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणातील प्रमुख संशयित मिरा-भाईंदरमध्ये लपल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा यांनी सापळा रचत इब्राहीमला उत्तन परिसरातून अटक केली.

प्राथमिक चौकशीत आरोपीविरोधात कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद असल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर विविध राज्यांत त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही प्रलंबित आहेत.सध्या इब्राहीमला वलसाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या अटकेनंतर अनेक प्रलंबित गुन्ह्यांचे गूढ उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सचिन सानप, उमेश भागवत, अशोक पाटील, अविनाश गर्जे, सायबर युनिटचे संतोष चव्हाण आणि त्यांच्या चमकदार टीमने सहभाग घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0