Pune News : DSK गुंतवणूक प्रकरण : पुणे पोलिसांकडून गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन!

•तांत्रिक कारणामुळे पूर्वी जाहीर केलेल्या तारखा रद्द – नवे वेळापत्रक लवकरच
पुणे | प्रसिद्ध डीएसके ग्रुप (डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स) आर्थिक घोटाळा प्रकरणात आता महत्त्वाची प्रगती होत आहे. गुंतवणूकदारांच्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये त्रुटी दुरुस्त करण्याच्या प्रक्रिया सुरू असून, पुणे पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
मागील आठवड्यात जारी केलेल्या नोटीसमध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान गुंतवणूकदारांनी पोलिस मुख्यालयात प्रत्यक्ष येऊन आपली माहिती तपासावी, असे सांगण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असून, नवे वेळापत्रक 15 जुलै 2025 नंतर अधिकृत माध्यमांतून जाहीर केले जाईल.
पुढील अपडेट कुठे मिळणार?
गुंतवणूकदारांनी पुढील माहिती फक्त अधिकृत स्रोतांवरूनच पाहावी:
टेलिग्राम बॉट: @mydskfdbot (EOW PUNE – DSK FD DATA)
जिल्हाधिकारी पुणे वेबसाइट: pune.gov.in
पुणे पोलिस वेबसाइट: punepolice.gov.in
डीएसके प्रकरण काय आहे?
डीएस कुलकर्णी (डीएसके) ग्रुप हे एकेकाळी पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा देणारे कॉर्पोरेट होते. मात्र, 2017-18 मोठ्या प्रमाणात ठेवीदारांकडून निधी गोळा करून परतावा न दिल्याने, हा प्रकार 3000 कोटींपेक्षा अधिक रकमेचा आर्थिक घोटाळा ठरला.
डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर, शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी एफडी (Fixed Deposit) आणि एसटीएल (Secured Term Loan) योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रकमेची उभारणी केली होती. परंतु ती रक्कम परत केली गेली नाही. यामुळे हजारो नागरिक आर्थिक संकटात सापडले. या प्रकरणी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि पोलिस यंत्रणांनी मालमत्ताही जप्त केली आहे.



