मुंबई

Devendra Fadnavis : “मनसेने संघर्षजन्य रूटच मागितला, म्हणूनच परवानगी नाकारली!” — मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा

•“मोर्चा काढायला बंदी नाही, पण कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणार असेल तर पोलिसांना निर्णय घ्यावा लागतो”

मुंबई | मिरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पोलिसांनी दिलेली नकारात्मक भूमिका आणि त्यावरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले की, “मनसेने जाणीवपूर्वक संघर्ष होईल, अशाच मार्गाची मागणी केली होती,” त्यामुळेच मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली.

विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “राज्यात कोणालाही मोर्चा काढण्याची बंदी नाही. पण जर मोर्चा ज्या रूटवर नेण्यात येतो, तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर पोलिसांना त्यांच्या जबाबदारीनुसार निर्णय घ्यावा लागतो.”

फडणवीसांनी सांगितले की, मोर्चा काढण्याच्या आधी मनसे आणि पोलिसांमध्ये रूटबाबत चर्चा सुरू होती. मात्र मनसेने विशिष्ट आणि पोलिसांसाठी अडचणीचा ठरणारा मार्गच घेतला. रेल्वे स्टेशन परिसरात ट्रॅफिक आणि सुरक्षा रेट्यांमुळे तणाव वाढण्याची शक्यता होती, याचा विचार करून पोलिसांनी त्यांच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली.

“मनसेला सभा घेण्याची परवानगी मात्र देण्यात आली होती,” असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न विचारता फडणवीस म्हणाले, “त्यांनी कुठलाही विशिष्ट मार्गाचा आग्रह धरला नव्हता, म्हणूनच त्या मोर्चाला परवानगी मिळाली.”

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वपक्षीय मोर्चा आयोजनाला योग्य पद्धतीने संवाद साधून रूट निश्चित करण्याचे आवाहन केले. “आंदोलन, सभा, मोर्चे हे लोकशाहीचे हत्यार आहेत, पण त्यात सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थाही तितकीच महत्त्वाची आहे,” असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0