Mumbai News : 32 वर्षांचा पाठलाग संपला! मुंबई दंगलीतील फरार आरोपी अखेर जेरबंद

•ओळख लपवून झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपीचा गुप्त शोध अखेर यशस्वी
मुंबई | मुंबईच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या 1993 च्या दंगलीत गुन्हा करून तब्बल 32 वर्षं गायब झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.हे कुठल्याही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हतं.
साल 1993. मुंबई रक्ताने थरथरत होती.दंगल, जाळपोळ, हिंसाचार आणि प्राणघातक हल्ल्यांनी शहर बेचैन होतं. याच काळात वडाळ्यात घडलेल्या एका दंगलप्रकरणात आरोपी असलेल्या आरीफ अली हशमुल्ला खान (54 वय) याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते – जमावबंदी भंग, हिंसाचार, आणि कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न. पण तेव्हापासून तो गायब, नाही सापडला कुठेही — ना मुंबईत, ना उत्तरप्रदेशात होता.
बंदर विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जुने प्रलंबित गुन्हे पुन्हा उघडण्याचे आदेश दिल्यानंतर, वडाळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या नेतृत्वाखाली एक अनुभवी पथक सज्ज झालं. उत्तरप्रदेशात खानचा शोध घेऊन पोलिसांनी काही प्राथमिक धागे उकलले.
त्यानंतर तांत्रिक तपास, मोबाईल ट्रेसिंग, आणि माहितीदारांचे जाळं वापरून हे निष्पन्न झालं की तो मुंबईतच, अँटॉप हिलच्या झोपडपट्टीत वेगळी ओळख घेऊन राहत आहे.त्या आधारे रचण्यात आलेल्या सापळ्यात खानला अखेर अटक करण्यात आली आहे. तब्बल 32 वर्षापासून फरार असलेल्या खानला पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पथकाला पोलिस उपायुक्त सागर यांनी विशेष बक्षीस देऊन गौरवले आहे. हा सगळा तपास म्हणजे कायद्या-अंमलबजावणी यंत्रणांचा संयम, कौशल्य आणि चिकाटी याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.



