Devendra Fadnavis : ठाकरे बंधू एकत्र आले, फडणवीसांचा ‘रुदाली’ टोला

Devendra Fadnavis On Thackeray Brother : “विजयी मेळावा नव्हता, रुदाली होती”, फडणवीसांचे प्रत्युत्तर; राज ठाकरेंचे मात्र आभार
पंढरपूर | त्रिभाषा सूत्राच्या आणि हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर आले. या ऐतिहासिक क्षणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत ‘रुदाली’ असा उल्लेख केला आहे.
उद्धव ठाकरेंचा खोचक हल्ला
वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले,“बऱ्याच दिवसांनी राज ठाकरे आणि मी एकत्र आलो आहोत. आमच्यातला जो आंतरपाट होता, तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही. आम्ही एकत्र आलो आहोत, राहण्यासाठीच.”
याच भाषणात त्यांनी भाजपवरही हल्लाबोल करत,“भोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला. भाजपाने वापरून फेकायची सवय लावली आहे.पण आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देऊ,” असा इशारा दिला.
फडणवीसांचा प्रत्युत्तरवार: “रुदालीचं भाषण”
या मेळाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले,“मी राज ठाकरेंचे आभार मानतो. त्यांनी मला दोघांना एकत्र आणल्याचे श्रेय दिले.मात्र, मेळावा ‘विजयी’ होता की ‘विलापसभा’, यावर प्रश्नच आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठीचा एक शब्दही बोलला नाही.
त्यांनी ‘सरकार गेलं, सत्ता द्या’ असं म्हणत एकप्रकारे ‘रुदाली’चं सादरीकरण केलं,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.
फडणवीस पुढे म्हणाले,
“मुंबईत मराठी माणसांना घरं मिळवून देण्यात आमचं सरकार यशस्वी झालं.
त्यामुळेच त्यांच्या मनात असूया आहे. आम्ही हिंदुत्ववादीही आहोत आणि मराठी माणसांच्याही बाजूला आहोत,” असं प्रतिपादन त्यांनी केलं.



