मुंबई
Trending

Thackeray Group : ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ घोषणेनं राज्यात नवा वाद!

Thackeray On Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनं विरोधक आक्रमक, ठाकरे गटाचा पलटवार

मुंबई | पुण्यात गुजराती समाजाने उभारलेल्या ‘जयराज स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कन्व्हेन्शन सेंटर’च्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ या घोषणेनं नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोपात शिंदेंनी दिलेल्या घोषणेनंतर विरोधकांनी तीव्र टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेने (शिंदे) अधिकृत समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “पुण्यातील गुजराती समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ या घोषणेपाठोपाठ ‘जय गुजरात’ असंही म्हणाले. त्या मुद्द्यावर बरीच कोल्हेकुई चालू आहे. अस्तित्वातच नसलेल्या मुद्द्यावर गुद्दे मारण्याचा हा उद्योग आहे. ‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे. ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता?”

शिवसेनेने म्हटलं आहे की “आज या मुद्यावरून जे टीका करत आहेत, त्यांच्या नेत्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा यापूर्वी दिलेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ‘केम छो वरळी’ ही होर्डिंग्ज लावणारे कोण होते? ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी प्रसिद्धिपत्रके पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते? त्यांनी गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केले. परंतु, आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली. त्यात कुठलेही राजकारण नव्हते.”

शिंदेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे की “हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी आमचा श्वास आहे, हे मी वारंवार सांगितले आहे. आमची नाळ ही मराठी माणसाशी जोडलेली आहे. ती कुणी कितीही प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. आम्ही स्वकर्तृत्वावर निवडणूका जिंकू शकतो. त्यासाठी अशा मुद्यांचं राजकारण करण्याची गरज आम्हाला नाही. गुजरात हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजराती बांधवांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे विष सध्या कालवले जात आहे. त्यापासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. यामुळे महाराष्ट्राचीच प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर मलिन होते, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे.जय हिंद, जय महाराष्ट्र”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0