
Dombivli Katai bridge : आंदोलकांचा दबाव, स्थानिक नेत्यांचा पाठपुरावा रंगला; शिंदे गटाच्या सूचनेनंतर पुलाचा अचानक लोकार्पण
डोंबिवली – पलावा चौक ते काटई निळजे दरम्यान गेली तीन वर्षे संथ गतीने सुरू असलेला रेल्वेमार्गावरील उड्डाण पूल अखेर शुक्रवारी कोणताही जाहिरातबाजीचा गाजावाजा न करता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. स्थानिक नागरीकांनी आणि राजकीय पक्षांनी वेळोवेळी या पुलाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या संघर्षाला यश आले आहे.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी जून अखेरपर्यंत पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही तांत्रिक व स्थापत्य अडचणींमुळे ते शक्य झाले नव्हते. यानंतर ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे आणि मनसेचे राजू पाटील यांनी एकत्रित मोर्चा काढून उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
या दबावानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुलाचा कोणताही मोठा कार्यक्रम न करता तो तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी सकाळी आमदार मोरे यांच्या उपस्थितीत गोपाळ लांडगे, राजेश कदम, सचिन सांडभोर यांच्यासह स्थानिक नेत्यांनी पूल वाहतुकीसाठी खुला केला.
नवीन पुलाच्या कामामुळे पलावा चौक, एक्सपेरिया संकुल, काटई चौक परिसरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी येथे केवळ दोनच उड्डाण पुलांवर वाहनांची गर्दी होत होती. आता तीन उड्डाण पुलांच्या वाहिकांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी राजू पाटील, दीपेश म्हात्रे यांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आमदार राजेश मोरे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडे तगादा लावून या कामाला गती दिली.हा पूल खुला झाल्यामुळे आता डोंबिवली, शिळफाटा, निळजे परिसरातील हजारो नागरिकांना वाहतूक सुसाटपणे पार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्घाटनाऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवण्याचा प्रकार नागरिकांमध्ये समाधान निर्माण करणारा ठरतोय.


