Vijayi Melava : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! ‘विजयी मेळाव्या’ तून मराठी अस्मितेचा बिगुल

•आवाज महाराष्ट्राचा, आवाज ठाकरेंचा; कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला
मुंबई :– महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याची! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही नेते एकत्र येत 5 जुलै रोजी मुंबईत ‘विजयी मेळावा’ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी सकाळी 11 वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी सुरू असून, नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला आहे. “आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा…” अशा दमदार घोषणांनी टीझरची सुरुवात होत असून, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागवणारे दृश्यपटही दाखवण्यात आले आहेत.
टीझरमध्ये ठाकरेंची पुन्हा एकदा महाराष्ट्राला हाक असल्याचे सांगितले जात आहे. “ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला… वाजत गाजत गुलाल उधळत या…” अशा ओळींनी मराठी माणसाच्या मनात अस्मितेची नवी उर्जा संचारली आहे.
या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असून, नागपूरमधूनही 50 पेक्षा अधिक पदाधिकारी, शहराध्यक्ष, जिल्हाप्रमुख सहभागी होणार आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन राजकीय रणनिती आखावी, अशी अपेक्षा असल्याचे चित्र आहे.
हा मेळावा केवळ शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मराठी अस्मितेच्या आणि ठाकरे नेतृत्वाच्या एकजुटीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. ठाकरे बंधूंची ही ऐतिहासिक भेट महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कोणती वळणं घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


