Dahisar News : दहिसरमधून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला; पाण्यात बुडून मृत्यूची शक्यता

Dahisar Latest News : केतकीपाडा दगडखाणीत साचलेल्या पाण्यात गुरुवारी मृतदेह आढळला
भाईंदर | दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा परिसरातून बुधवारी बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह अखेर गुरुवारी आढळून आला. केतकीपाडा येथील जुन्या दगडखाणीमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता दहिसर पोलिसांनी वर्तवली आहे.
बुधवारी दुपारी संबंधित मुलगा आपल्या काही मित्रांसह फिरण्यासाठी दगडखाणीच्या परिसरात गेला होता. पावसाचे पाणी साचल्याने तेथे तलावासारखे दृश्य तयार झाले होते. काही वेळ सर्व मुले परिसरात फिरत होती. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वजण परत निघाले. त्या वेळी मृत मुलाने नैसर्गिक विधीसाठी जाऊन येतो, असे मित्रांना सांगितले. त्यानंतर तो दिसेनासा झाला.
मित्रांसोबत गेलेला मुलगा पाय घसरून पडल्याची शक्यता; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
बराच वेळ शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता गुरुवारी दुपारी संबंधित मुलाचा मृतदेह पाण्याने भरलेल्या दगडखाणीत आढळून आला. प्राथमिक तपासात पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.


