Mumbai Police News : प्रसंगावधान आणि पोलीसांची धाडसाची झलक! समुद्रात उडी मारलेली महिला वाचवली

Mumbai Bandra Police Latest News : वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथे 53 वर्षीय महिलेला पोलिसांनी दिले जीवदान
मुंबई | वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड समुद्रकिनाऱ्यावर आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका 53 वर्षीय महिलेला वाचवून पोलिसांनी वेळेवर दाखवलेले प्रसंगावधान आणि धाडसाचे उदाहरण ठरले आहे. मानसिक नैराश्यातून ग्रस्त असलेल्या या महिलेने समुद्रात उडी मारून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तिचे प्राण वाचवले. Mumbai Police Latest News
बुधवारी दुपारी 3 वाजता ही महिला अचानक समुद्रात उडी मारताना दिसली. त्यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी साईनाथ देवडे यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट समुद्रात उडी घेतली. काही क्षणांतच त्यांनी त्या महिलेला किनाऱ्यावर आणले आणि तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकारानंतर साईनाथ देवडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, “अशा घटना टाळण्यासाठी आम्ही समुद्रकिनारी सतत गस्त ठेवत आहोत. दिवसा आणि रात्री, 5 पोलिसांचे विशेष पथक तैनात असते.”



