Thane Crime News : रिक्षा चोरून प्रवासी वाहतूक करणारा ‘चालता फिरता गुन्हेगार’ अखेर जेरबंद!

•चोरीच्या रिक्षातच प्रवाशांना घेवून कमावायचा पैसे; इंधन संपलं की रिक्षा टाकून पलायन
ठाणे | रिक्षा चोरायचा, प्रवासी घेऊन पैसे कमवायचे, आणि इंधन संपलं की ती रिक्षा टाकून द्यायची – अशी ‘फिल्मी स्टाईल’ हाणामारी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल 2 लाख 55 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, ठाणे-मुंबईतील चोरीच्या 6 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
यश दीपक कोठारी उर्फ यासीन हुसेन पठाण (वय 32, रा. बोरीवली प.) हा संशयित तिनहात नाका परिसरात फिरताना नौपाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रंगेहाथ पकडला. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.
19 पोलीस ठाण्यांमध्ये नोंद, 2.55 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; नौपाडा पोलिसांची कारवाई
चौकशी दरम्यान आरोपीने नौपाडा, कळवा, बोरीवली परिसरात रिक्षा व दुचाकी चोरण्याची कबुली दिली. तो चोरीच्या रिक्षांचा वापर करून सामान्य प्रवाशांना वाहून पैसे कमवत असे. विशेष म्हणजे इंधन संपले की रिक्षा रस्त्यावर सोडून देऊन दुसरी चोरी करायची ही त्याची शैली होती.
दुचाकी मात्र तो फक्त स्वतःसाठी फिरायला, मौजमजेकरिता वापरत असे.तपासात उघडकीस आले की आरोपीवर राज्यातील तब्बल 19 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.ज्यात 3 रिक्षा व 3 दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून काही चोरीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नौपाडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने शहरातील वाहन चोरी प्रकरणांवर मोठा आळा बसण्याची चिन्हं आहेत.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम,विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड, विलास देसाई,ईश्वर गोलवड, मेहरबान तडवी, पोलीस शिपाई सारंग कांगणे, गंगाधर तिर्थकर,प्रमोद शिंदे यांनी केलेली आहे.



