Satara News : वारीत दु:खद घटना; विजेचा धक्का बसून दोन वारकऱ्यांचा मृत्यू

Satara News : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील साताऱ्यातील मुक्कामी झाली दुर्दैवी घटना
सातारा, फलटण | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (29 जून) रात्री सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथे घडली. मृत वारकऱ्यांची नावे तुषार रामेश्वर बावनकुळे (22, रा. खलासना, नागपूर) आणि मधुकरराव तुकाराम शेंडे (55, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी आहेत.
पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांचा मुक्काम बरड येथे असताना वीजेच्या खांबावर कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधली जात होती. यावेळी तुषार बावनकुळे यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेले मधुकरराव शेंडे यांनाही विजेचा शॉक बसला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मृतांमध्ये असलेले मधुकरराव शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारी सेवा व सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते.
दोन्हीही वारकरी वासुदेव महाराज टापरे यांच्या दिंडीत सहभागी होते. या दुःखद घटनेमुळे वारीतील वारकऱ्यांमध्ये हळहळ पसरली आहे. पंढरपूर जवळ आल्यावर अशी हृदयद्रावक घटना घडल्याने अनेकांची डोळ्यांत अश्रू उभे राहिले.


