Railway Mega Block : मध्य व हार्बर रेल्वेवर 29 जूनला मेगाब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने
Sunday Railway Mega Block News ठाणे–कल्याण व पनवेल–वाशी मार्गांवर रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल दुरुस्तीसाठी ब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेने 29 जून, रविवार रोजी ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल दुरुस्ती आणि अन्य तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून याचा परिणाम मुंबईकरांच्या प्रवासावर होणार आहे.
मध्य रेल्वेवरील ब्लॉक
ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होतील तर काही फेऱ्या 20 मिनिटांपर्यंत उशिराने धावतील, असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
हार्बर मार्गावरील ब्लॉक
पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर 11.05 ते 04.05 या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल या मार्गांवरील सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी/नेरूळ आणि खारकोपर मार्गावर लोकल सेवा नियमित सुरू राहणार आहे. विशेषतः सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही ब्लॉक घेतलेला नसून वसई रोड ते वैतरणा दरम्यानचा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्रीच पार पडला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवासापूर्वी अपडेटसाठी अधिकृत रेल्वे प्लॅटफॉर्मवर माहिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.



