
Sanjay Raut On Nitesh Rane : संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई न्यायालयाचा नितेश राणे यांच्या विरोधात गैरजामीनपात्र वॉरंट
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी ( 26 जून) मुंबईतील न्यायालयाने राणे यांच्या विरोधात थेट गैरजामीनपात्र वॉरंट जारी केलं.
या प्रकरणात यापूर्वी देखील राणे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी वारंवार अनुपस्थिती दर्शवली. दोन जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी न्यायालयात स्थायी गैरहजेरीसाठी अर्ज सादर केला होता. तरीही न्यायालयाने या वर्तनाची गंभीर दखल घेत वॉरंट काढले आहे.
मुळ प्रकरण मे 2023 मधील आहे. त्यावेळी नितेश राणे यांनी एका मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांचा उल्लेख ‘साप’ असा करत, त्यांनी जून महिन्यापर्यंत ठाकरे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एनसीपी) प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी राणे यांच्या विरोधात मानहानीची तक्रार न्यायालयात दाखल केली होती.


