Fake Digital Arrest : व्हिडीओ कॉलवर ‘सीबीआय’ची नाटकी अटक; ठाण्यात 3 कोटींची फसवणूक करणारे तिघे जेरबंद

Thane Fake Digital Arrest News : डिजीटल अटकेची भीती दाखवत उद्योजकाकडून कोट्यवधी उकळले; ठाणे सायबर पोलिसांचे यश
ठाणे | आपण केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचा बनाव करत व्हिडीओ कॉलवर ‘डिजीटल अटके’ची धमकी देत एका व्यक्तीकडून तब्बल ३ कोटी ४ लाख रुपये उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील तिघांना ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी ही रक्कम टप्प्याटप्प्याने वसूल करून क्रिप्टोचलनाद्वारे परदेशात पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. Thane Latest Crime News
किशोर जैन (63 वय), महेश कोठारी (36 वय) आणि धवल भालेराव (26 वय) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यातील किशोर जैन हे एका पतपेढीचे अध्यक्ष आहेत, महेश कोठारी कपडे विक्री व्यवसायात असून धवल भालेराव सौंदर्यवर्धक उत्पादने विक्रीत गुंतलेला आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आंतरराष्ट्रीय सायबर टोळीच्या जाळ्यात कसे अडकले, याचा तपास पोलीस करत आहेत.
फसवणूक झालेला व्यावसायिक ठाण्यात राहणारा असून, एका अनोळखी व्हिडीओ कॉलवरून ‘सीबीआय अधिकारी’ असल्याचा बनाव करून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला.
त्याला सांगण्यात आलं की, त्यांच्या नावाने पार्सल पाठवण्यात आलं असून त्यामध्ये अमली पदार्थ आढळले आहेत. बदनामी, अटक व चौकशी यांची भीती दाखवून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने 3 कोटी 4 लाख रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करवून घेतले.
या फसवणुकीची जाणीव होताच संबंधिताने तात्काळ ठाणेनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणाचा समांतर तपास ठाणे सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता.


