Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा वाढता धोका! शहरात 40 रुग्ण; पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

Mira-Bhayandar: महापालिकेचे जनतेला आवाहन – गाफील न राहता घ्या योग्य काळजी
मिरा रोड | मिरा-भाईंदर शहरात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या 40 रुग्ण डेंग्यूने बाधित असून, पावसाळ्यात हा आकडा आणखी वाढू शकतो, असा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. Mira-Bhayandar या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात डेंग्यूचे 3 रुग्ण होते, मात्र महिन्याच्या अखेरीस हा आकडा 40 वर पोहोचला. याचप्रमाणे, मलेरिया रुग्णांची संख्या मार्चमध्ये 21 वरून मेमध्ये 54 वर पोहोचली आहे. हे आकडे साथीच्या आजारांच्या संभाव्य लाटेची सूचना देत आहेत.
पावसाचे साचलेले पाणी, स्वच्छतेचा अभाव आणि उष्ण-आर्द्र हवामान यामुळे डेंग्यूचा प्रसार पावसाळ्यात अधिक झपाट्याने होतो. त्यामुळे, “पाणी साचू देऊ नका, अंगावर चादर घाला, पोषक आहार घ्या आणि ताप किंवा अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या,” अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासन औषध फवारणी, जलशुद्धीकरण, स्वच्छता मोहीम आदी उपाययोजना राबवत आहे. मात्र जनतेचा सहभाग आणि खबरदारी हाच डेंग्यूवर नियंत्रणाचा प्रभावी उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार लहाने यांनी सांगितले.”गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. कृपया स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


