महाराष्ट्रसांगली-मिरज
Trending

 Maruti Chitampalli : ‘अरण्यऋषी’ चितमपल्ली यांना शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप

 Maruti Chitampalli : निसर्गाशी आयुष्यभर संवाद साधणाऱ्या ऋषितुल्य लेखकाला अनोखी आदरांजली

सांगली | पक्ष्यांच्या आवाजातून संवाद साधणारा, जंगलाच्या स्पंदनावर प्रेम करणारा आणि संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सहवासात घालवणारा ‘अरण्यऋषी’… अशा पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.  Maruti Chitampalli त्यांच्या निधनामुळे निसर्ग, साहित्य आणि पर्यावरण प्रेमींच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

93 वर्षीय चितमपल्ली यांनी बुधवारी रात्री सोलापुरात वृद्धापकाळाने शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच साहित्यिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोकाची लाट उसळली. त्यांच्या हेरिटेज मणिधारी सोसायटीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

तुळजापूर रस्त्यावरील श्री रूपाभवानी स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्काराला जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. पोलीस पथकाकडून हवेत तीन बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली.

निसर्गप्रेमाला कलाविष्कारातून मानवंदना

चितमपल्ली यांच्या अंत्ययात्रेत पारंपरिक हलगी, सनई-तुतारी आणि संबळच्या सुरांनी वातावरण भारावून गेले. अक्कलकोटमधील कलावंतांनी नारळ फोडून श्रद्धांजली वाहिली, तर अंबादास कनकट्टी यांनी मोर, कोकिळा, चिमणीसह अनेक पक्ष्यांचे आवाज हुबेहूब सादर करत अनोखी आदरांजली दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, “चितमपल्ली यांच्या रूपाने देशातला एक थोर मार्गदर्शक निसर्गप्रेमींनी गमावला आहे. त्यांच्या लेखणीने अनेक पिढ्यांना निसर्गाशी संवाद साधायला शिकवले.” लेखक अच्युत गोडबोले, इंद्रजित भालेराव यांच्यासह अनेकांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

वाचनालयात शोकसभा

सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयात २० जून रोजी संध्याकाळी सहाला चितमपल्ली यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0