Roshni Songhare Last Rites : हवाई स्वप्नांचा शेवट… विमान अपघातात ठार झालेल्या रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

•Ahmedabad Plane Crash Roshni Songhare Last Rites ‘आकाशात झेप घेणाऱ्या’ मुलीचा शोकांत प्रवास संपला; नातेवाईकांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार
डोंबिवली | अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात मृत्यू झालेल्या डोंबिवलीच्या हवाई सेविका रोशनी राजेंद्र सोनघरे (वय 27) यांच्यावर गुरुवारी सकाळी शहरातील शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबीय, नातेवाईकांसह शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
रोशनी सोनघरे गेल्या आठवड्यात अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात हवाई सेविका म्हणून कार्यरत होत्या. परंतु टेकऑफदरम्यान झालेल्या दुर्घटनेत विमान जळून खाक झाले आणि त्यात रोशनी यांचाही दुर्दैवी अंत झाला. मृतदेह ओळखता येणार नाही इतका जळाल्याने डीएनए चाचणीद्वारेच ओळख पटवावी लागली.
त्यांच्या वडिलांनी आणि भावाने अहमदाबादला जाऊन डीएनए नमुने दिले. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच बुधवारी मृतदेह ताब्यात देण्यात आला. एअर इंडियाच्या विशेष विमानातून पार्थिव मुंबईत आणण्यात आले आणि गुरुवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी हंबरडा फोडणाऱ्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.
रोशनी सोनघरे यांनी कष्टाने शिक्षण घेत हवाई सेविकेपर्यंतचा प्रवास केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान अपघातातील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश हादरला असून, एअर इंडियाकडूनही शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली आहे.


