Pune Crime News : जांभुळवाडीतील निर्घृण खून प्रकरणातील आरोपीला इंदौरला जाऊन अटक 24 तासांत खुनाचा छडा

•तलावाजवळ तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेशातून केली अटक,तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार, आरोपी गजाआड
पुणे | पुण्याच्या जांभुळवाडी परिसरात तलावाच्या बांधावर एका तरुणाचा थरारक खून करून आरोपी इंदौरला फरार झाला होता. मात्र आंबेगाव पोलिसांनी फक्त 24 तासांत आरोपीला शोधून काढत गजाआड केल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे!
14 जूनच्या रात्री, शांत वाटणाऱ्या जांभुळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर चिखलात माखलेला रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनंतर आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात मृत युवकाचा मित्र दीपक सुरेश बंडगर (वय 21) याने दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस तपास पथकाने घटनास्थळी पुरावे गोळा करताच संशयित सूरज गणेश सूर्यवंशी (वय 22) याचे नाव पुढे आले. तो पुण्याहून थेट इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथक इंदौरकडे रवाना झाले.
तांत्रिक विश्लेषण, फोन लोकेशन आणि स्थानिक खबर्यांच्या मदतीने अखेर सूरजला शोधण्यात यश आले. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून सुटण्याचा त्याचा डाव फसला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अधिकृतरित्या अटक करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कौशल्याने पार पडली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार – मोहन कळमकर, चेतन गोरे, हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांचे धडक कारवाई केली आहे.



