मुंबई

Sanjay Raut : धुळे विश्रामगृह प्रकरणाचा भडका – संजय राऊतांचा थेट फडणवीसांना सवाल!”

•Sanjay Raut Questions Devendra Fadnavis कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी ईडीकडे द्या”,”समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप; सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न”

मुंबई | धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विश्रामगृहाच्या एका खोलीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने, हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून ‘राजकीय अभयामुळे फोफावलेला भ्रष्टाचार’ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. “ही फक्त सुरुवात आहे, योग्य तपास झाला तर अनेक गोष्टी उघडकीस येतील,” असे राऊत म्हणाले.

यापूर्वीही ‘अंदाज समिती’च्या नावाखाली निधी गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यावर केवळ प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांनी या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे गांभीर्य लक्षात घेता ईडीमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरही संजय राऊत यांनी थेट गंभीर आरोप केले आहेत. यामुळे भाजप-शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेले पत्र…

महोदय, भ्रष्टाचारी तुरुंगात जातील. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही असे आपण अधूनमधून सांगत असता. मात्र गेल्या काही वर्षांत आपण भाजपचे डम्पिंग ग्राऊंड करून भ्रष्टाचारात बरबटलेला सर्व कचरा स्वपक्षात सामील करून घेतला व त्यांचे समर्थनही आपण करता. त्यामुळे खरे फडणवीस नक्की कोणते? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे एक प्रकरण धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात घडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात 21 मेच्या मध्यरात्री विश्रामगृहाच्या खोली क्र. 102 मध्ये 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. या खोलीतून 3 कोटी रुपये आधीच बाहेर नेले व 10 कोटी जालन्यात पोहोचवले. धुळे दौ-यावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या ‘पीए’च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी खंडणीरुपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीपासून हे प्रकरण सर्वच पातळीवर दडपण्याचा व भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला.

जनक्षोभ वाढला तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? सदस्य कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निवळ धूळफेक आहे. आता असे समोर आले की, एसआयटी राहिली बाजूला, खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले. ही बाब लाजिरवाणी व आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहात हे दर्शविणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचाच हा प्रकार आहे.

आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण व त्यांचे ‘पीए किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा असे मी आपणास सुचवीत आहे.

प्रिय देवेंद्रजी, धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाला तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. विश्रामगृहावर सापडलेले घबाड है अंदाज समिती अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठीच गोळा केले. माझ्या माहितीप्रमाणे धुळे शहरातील व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समिती अध्यक्षांना देण्यासाठी ही रक्कम गोळा केली. त्या पिशवीवर ‘R’ लिहिले होते. धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10000 प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले.

ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर ‘समिती’चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले. याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर ती मिळू शकेल. आपल्या राज्यातला भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे व आपण फक्त राजकीय मसलती व उद्योग-व्यापारात गुंतून पडला आहात. धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील. तूर्त तरी अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना महाराष्ट्र भूषण व त्यांच्या पीएंना ‘पद्मश्री’ने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचा बहुमान करावा असे मी आपणास सुचवीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0