ACB Trap News : ‘रास्तभाव दुकानासाठी लाच मागणारी महिला अधिकारी रंगेहाथ गजाआड!”

Chatrapati Sambhaji Nagar Bribe News : तक्रारदाराकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व स्वतःसाठी 70 हजारांची मागणी; सापळा रचून 40 हजार घेताना अटक
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडाकेबाज सापळा कारवाईत गंगापूर तालुक्यातील महिला पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे यांना 40, हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रास्तभाव दुकान चालू ठेवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. Chatrapati Sambhaji Nagar Latest Bribe News
तक्रारदाराच्या आजोबांच्या नावाने असलेले काटेपिंपळगाव येथील रास्तभाव दुकान वारसाने चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राधिकृततेचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी मिळून तब्बल 70 हजार रुपयांची लाच मागितली. लाच द्यायची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली.
13 जून रोजी पडताळणी कारवाईत, आरोपीने तडजोड करत 40 हजार रुपये तडजोडीची रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर 14 जून रोजी वस्तू व सेवा कर भवनजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना कांचन कांबळे यांना शासकीय पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली.
त्यानंतर करण्यात आलेल्या अंगझडतीत आयफोन 13 प्रो, आणखी एक मोबाईल, 3 हजार रुपयांची रोकड, तसेच गाडीत लपवलेली लाचेची 40 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. दोन्ही मोबाईलचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून, अधिक तपासही सुरू आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे, सहाय्यक अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे, आणि पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणी भ्र.प्र. अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



