Ahmedabad Air Plane Crash : अहमदाबादमध्ये कोसळले; 100 प्रवाशांचे मृतदेह सापडले

•माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात; मृत्यूची भीती
लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे प्रवासी विमान AI-171 गुरुवारी दुपारी 1.40 च्या सुमारास अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही मिनिटांतच कोसळले. ही दुर्घटना इतकी भीषण होती की 242 प्रवाशांपैकी सुमारे 100 जणांचे मृतदेह घटनास्थळीच आढळून आले, तर उर्वरितांचा शोध व बचावकार्य सुरू आहे.
टेकऑफनंतर थेट इमारतींवर कोसळले विमान
विमानात 230 प्रवासी व 12 क्रू मेंबर्स होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच विमानाचे नियंत्रण सुटल्याने ते अहमदाबाद शहरातील रहिवासी भागात — काही बहुमजली इमारतींवर कोसळले. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात धुराचे लोट आणि अराजक निर्माण झाले.
गुजरात पोलीस, अग्निशमन विभाग, वैद्यकीय पथके आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत 100 मृतदेह सापडले असल्याचे अधिकृत सांगण्यात आले.
राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत “मन हेलावून टाकणारी” अशी प्रतिक्रिया देत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या अपघातावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, “अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी घटना आहे. हवाई सुरक्षेबाबत केंद्र सरकारने आणि विमानसेवा कंपन्यांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.” त्यांनी या दुर्घटनेनंतर सर्व विमानसेवा कंपन्यांनी सुरक्षेचा फेरआढावा घेण्याची गरजही अधोरेखित केली.
शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते आदित्य ठाकरे यांनीही शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “ही घटना अत्यंत धक्कादायक आहे,” असे म्हणत ईश्वरचरणी सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.
तीन दिवसांचा शोकवटा; मशाल मोर्चा स्थगित
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीन दिवसांचा शोकवटा पाळण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, नियोजित मशाल मोर्चा स्थगित करण्यात आला असून, दि. 15 जूननंतर नव्याने तारीख निश्चित करून ती प्रदेश कार्यालयाला कळवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना या दुर्दैवी घटनेप्रती एकजूट दाखवत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने गुजरातला पाठवले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची विशेष समिती गठित करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विजय रुपाणी यांचा मृत्यू?
या अपघातातील सर्वात मोठा धक्का म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानात प्रवास करत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत भीती व्यक्त होत आहे, परंतु अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अपघातानंतर त्यांची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्याच्या खरेपणाची पडताळणी सुरू आहे.



