Mumbai And Thane Weather Today : मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा; 14-15 जूनला मुसळधार पावसाची शक्यता!

Mumbai And Thane Weather Today : हवामान विभागाचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई :- आगामी काही दिवसांत मोसमी पाऊस पुन्हा जोर धरू लागणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले असून, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना आजपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Mumbai And Thane Weather Today विशेषतः 14 आणि 15 जून रोजी या भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दक्षिण महाराष्ट्र व तामिळनाडूदरम्यान द्रोणीय स्थिती तयार झाली असून, त्यासोबतच उत्तर ओडिशा भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाची चळवळ सुरू होण्याची शक्यता आहे. 12 ते 17 जून या कालावधीत दक्षिण कोकणात व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेपूर्वी दाखल झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गतीला मर्यादा आली होती. तथापि, आता मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान तयार होत असून, शनिवारपासून मध्य व पूर्व भारतात पुन्हा एकदा वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 564.7 मिमी पावसासह सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर अधिक जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


