Nicholas Pooran : मॅरूनची आठवण ठेवत…” निकोलस पूरनने वयाच्या 29व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला निवृत्तीचा धक्कादायक निर्णय!

Nicholas Pooran Retirement News : चाहत्यांमध्ये खळबळ! फक्त 29व्या वर्षी संन्यासाची घोषणा; 61 वनडे, 106 टी20 सामन्यांमधून गाजवला आंतरराष्ट्रीय प्रवास
वेस्ट इंडीजच्या आक्रमक फलंदाज निकोलस पूरन याने आज, 10 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला आहे. केवळ 29 वर्षांचा असतानाच त्याने हा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
पूरनने एक भावनिक संदेश शेअर करत आपली भावना व्यक्त केली. “मॅरून जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरून 100 टक्के देण्याचा प्रयत्न करणं — हे क्षण शब्दांत मांडणं कठीण आहे,” असे त्याने लिहिले. “टीमचं नेतृत्व करणं माझ्यासाठी सन्मानाची बाब होती.”
भावनिक निरोप…
पूरन पुढे लिहितो, “हा खेळ अनेक अविस्मरणीय क्षण देऊन गेला. वेस्ट इंडीजचं प्रतिनिधित्व करणं, चाहते, कुटुंब आणि सहकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास – यासाठी मी कायम ऋणी राहीन.”
करिअरची झलक
पूरनने 2016 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर 2019 मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 61 वनडे (1983 धावा, 3 शतकं, 11 अर्धशतकं) आणि 106 टी20 सामने (2275 धावा, 13 अर्धशतकं) खेळले. त्याने वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी क्रिकेट खेळले नव्हते.
19 डिसेंबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध झालेला टी20 सामना हा पूरनच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अखेरचा क्षण ठरला.
त्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे वेस्ट इंडीज संघात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण पूरनने आपल्या चाहत्यांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे.



