मुंबई

Nalasopara Crime News : 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश! बनावट नोटा छापून चलनात वितरीत करण्याचा कट उधळला

•काशीगाव पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, 216 बनावट नोटांसह प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त

नालासोपारा :- काशीगाव पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आणि त्या चलनात वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा इसमांना अटक करून एक मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 216 बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत केले आहे.

दि. 2 जून 2025 रोजी काशीगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मिरा रोड येथील विनय नगर परिसरात दोन इसम 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून सूपर्ना रामकृष्ण मन्ना (वय 24) आणि सूर्यदेव गोपीनाथ गायेन (वय 20) यांना अटक केली.

त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या अंगाजवळ 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या राहत्या खोलीची झडती घेतली असता, आणखी 190 बनावट नोटा, एच.पी. कंपनीचा कलर झेरॉक्स प्रिंटर, प्लेन कागद, चाकू, स्कुल पॅड आणि फुटपट्टी असे साहित्य जप्त केले. आरोपींनी हे बनावट नोटांचे छपाई काम स्वतःच्या खोलीत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 178,179,180,181,182 व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना दिनांक 8 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

या कारवाईचा तपास पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी करत असून, मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातील नागरिकांना बनावट नोटांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणालाही बनावट चलन वाटप करताना दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0