Abu Azmi : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समाजविघातक घटकांवर कडक कारवाई करा – अबु आझमीची मागणी
Abu Azmi On Bakra Eid 2025 : बजरंग दलाच्या दहशतीने मुस्लीम परिसरात कुर्बानी करण्यावर विरोध
मुंबई :– बकरी ईद जवळ आल्यामुळे राज्यातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मुस्लीम धर्मियांचा हा महत्त्वाचा सण येत असताना, काही बाजूने बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम परिसरात फिरून कुर्बानी होऊ नये असे इशारे देत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. Abu Azmi On Bakra Eid 2025 या हिंसक आणि समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई होण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद परिसरात बजरंग दलाचे विरोधक कुर्बानीला आव्हान देत आहेत. 7 जून रोजी येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी करणे मुस्लीम धर्मीयांची परंपरा आहे, परंतु राज्यातील गोवंशाच्या हत्येस बंदी असूनही बकरीच्या कुर्बानीला विरोध करणाऱ्या समाजविघातक घटकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आमदार आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक संजय वर्मा यांना निवेदन देऊन या घटकांवर त्वरित कारवाई करण्यासाठी आवाहन केले आहे.
तसेच, राज्य गोसेवा आयोगाने बकरी ईदच्या काळात जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिल्याने शेतकरी, व्यापारी, पशुपालक आणि मुस्लीम धर्मीय या सर्वांना मोठा आर्थिक आणि धार्मिक त्रास सहन करावा लागत आहे. मुस्लीम नेत्यांच्या तक्रारीनंतर या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे, परंतु यामुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीमुळे सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.



