Kalyan News : शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली!

किल्ल्याच्या नुतनीकरणासाठी ठाकरे गटाची सरकारकडे ठाम मागणी
कल्याण | इतिहास साक्ष देणारा आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जाणारा शिवकालीन दुर्गाडी किल्ला बुधवारी पुन्हा एकदा असुरक्षिततेच्या गर्तेत सापडला. दुपारी पडलेल्या मुसळधार पावसात किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र या दुर्घटनेमुळे या किल्ल्याच्या जतनाविषयीच्या यंत्रणांच्या ढिसाळतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बंड्या साळवी यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. “दुर्गाडी किल्ला हे केवळ वारसास्थळ नसून हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. मागील चार वर्षांत किल्ल्याचे अनेक बुरूज आणि भिंती कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे किल्ल्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवत संपूर्ण नुतनीकरण करणे आवश्यक आहे,” असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली.
दुर्गाडी किल्ल्याच्या देखभालीचं काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. मात्र काम चालू असतानाही संरक्षक भिंती कोसळत असाव्यात, ही गोष्ट गंभीर असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी व्यवसाय करणारे विक्रेते आणि पादचारी यांची जीवितहानी टळल्याने हायसे वाटत असले तरी भविष्यातील धोका अद्याप टळलेला नाही.
किल्ल्यावर दुर्गादेवीचे स्थान असल्याने हा भाग धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याचे संपूर्ण सौंदर्यीकरण व जतन करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. आता या ऐतिहासिक ठिकाणाच्या संरक्षणासाठी शासन कोणते पावले उचलते, याकडे संपूर्ण कल्याणचे लक्ष लागले आहे.


