Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची राज्य सरकारकडून घोषणा

Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यानगर जिल्ह्यात 300व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
अहिल्यानगर :- अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट तयार करणार आहे.




मुख्यमंत्री म्हणाले की, “ज्याप्रमाणे ‘छावा’ या चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्यात आला, त्याच धर्तीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण ठेवणारा चित्रपट साकारण्यात येणार आहे.”
याप्रसंगी फडणवीस यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून ‘अहिल्यानगर’ करण्यात आले असून, यामागे अहिल्यादेवींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हेतू आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले होते. त्यांनी म्हटले की, एकीकडे जन्मभूमी आणि दुसरीकडे कर्मभूमी – दोन्ही पवित्र स्थळे एकत्र अनुभवायला मिळणार आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.
अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी 28 वर्षे योग्य आणि कल्याणकारी राज्य चालवले. “शिवाजी महाराजांनंतर जनतेच्या हितासाठी राज्य करणाऱ्या अहिल्यादेवींचा आदर्श अनन्य आहे. त्यांनी मजबूत तोफखाना उभारून राज्यावर कुणालाही आक्रमण करायची हिंमत होऊ दिली नाही,” असे ते म्हणाले.
सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे योगदान अधोरेखित केले. “औरंगजेबाने मंदिर नष्ट केल्यानंतरही कोणीही ते पुन्हा उभारण्याची हिंमत केली नव्हती. मात्र अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी नवीन मंदिर उभारून, नष्ट झालेल्या मंदिराचे अवशेष तसचे ठेवले – जेणेकरून हिंदू समाज जागृत होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, दहेज प्रथेविरुद्ध त्यांच्या भूमिका आणि त्या काळात त्यांनी लागू केलेले सामाजिक सुधारणांचे कार्यही फडणवीस यांनी सांगितले. “अहिल्यादेवींनी दहेज प्रथा थांबवली. त्यांच्या राज्यात कुणीही दहेज घेण्याची हिंमत करत नव्हता,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.



