Nashik Bribe News : “साहेबांसाठी लाच द्या!” – म्हणताच सापळा पडला, हवालदार रंगेहाथ गजाआड!

•लाच मागणीप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला! चॉकलेट व्यापाऱ्याला वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत विभागाची कारवाई
नाशिक :– अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने चक्क “साहेब” म्हणत चॉकलेट बिस्किट व्यवसाय करणाऱ्या नागरिकाकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत उमाकांत रंगनाथ टिळेकर (वय 39) रंगेहाथ अडकला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराच्या व्यवसायासंबंधी दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा नोंदवू नये म्हणून हवालदाराने पैसे मागितले होते. याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळताच पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला आणि पडताळणी केली.पंचांसमक्ष तपासणीदरम्यान टिळेकर यांनी स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रभाव वापरून वीस हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या मोबाईलचा तपास केला जात असून घरझडतीही सुरू आहे.स्पष्ट पुराव्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत टिळेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 आणि 7A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,पोलीस उप अधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस हवालदार अनिल गांगोडे यांच्यासह पार पडली.



