Pakistani Spy : देशद्रोहाचा ‘डिफेक्ट’! ठाण्यातील अभियंता पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अडकला

Pakistani Spy : नौदलाच्या युद्धनौकांची गोपनीय माहिती WhatsApp वरून पाकिस्तानला फॉरवर्ड
ठाणे :- भारताच्या सुरक्षेचा ‘डिफेक्ट’ शोधून काढणाऱ्या एका अभियंत्याने चक्क देशाशीच गद्दारी केली! ठाण्याच्या कलवा परिसरात राहणाऱ्या रविंद्र मुरलीधर वर्मा (वय 27) याला महाराष्ट्र ATS ने अटक केली आहे. तो पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा PIO च्या संपर्कात होता आणि त्याने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या गोपनीय डिफेक्ट लिस्ट सोशल मीडियावरून शेअर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
वर्मा हा क्रिसने डिफेन्स टेक्नोलॉजी लिमिटेड या संरक्षणसंबंधित कंपनीत कार्यरत होता. ही कंपनी नौदलासाठी विविध तांत्रिक सेवा पुरवते. विशेष म्हणजे वर्माकडे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याची अधिकृत परवानगी होती. त्यामुळेच त्याच्याकडे नौदलाच्या सुपर सीक्रेट डिफेक्ट रिपोर्ट्स होते, जे त्याने थेट पाकिस्तानी एजंटला दिले!
ATS च्या मते, वर्मा नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुकवरून एका पाक एजंटच्या संपर्कात आला, आणि पुढील सहा महिन्यांत WhatsApp च्या माध्यमातून संवेदनशील माहिती पलीकडे पाठवली.
त्याच्या विरोधात गुप्तचर अधिनियम 1923 आणि IPC कलम 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजून दोन संशयित आरोपी तपासाच्या जाळ्यात आहेत.
वर्माचे मोबाइल, लॅपटॉप, आणि सोशल मीडिया चॅट्स तपासले जात आहेत, जेणेकरून तो किती खोलपर्यंत गुंतलेला होता हे स्पष्ट होऊ शकेल. गुरुवारी कोर्टात हजर केल्यानंतर वर्माला 1 जूनपर्यंत ATS कोठडीत ठेवण्यात आले आहे.



