मुंबई

Dombivli News : डोंबिवलीत पावसाचा कहर! एक तासात जलप्रलय; शहर ठप्प!

नालेसफाई पूर्ण झाली” हा पालिकेचा दावा पाण्यात गेला!

डोंबिवली :- बुधवारी दुपारी डोंबिवली आणि कल्याण परिसरात निसर्गाने आपला रौद्र अवतार दाखवला. सकाळपासून उन्हात आणि ढगांमध्ये सुरू असलेला खेळ अचानक दुपारी मुसळधार पावसात बदलला. घड्याळभरात आकाश काळ्या ढगांनी व्यापलं आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू लागला. या अवकाळी तडाख्यामुळे शहराची वाहतूक आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय, उदवाहन परिसर, आणि खासदारांच्या बंगल्यासमोरील रस्ते जलमय झाले. गुडघाभर पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात पादचारी रस्ता ओलांडू शकले नाहीत, तर बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांची धांदल उडाली. दुकानांबाहेर लावलेला माल भिजल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले.

रेल्वे स्थानकांबाहेरही प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्री नसल्यानं अनेक प्रवासी पावसात अडकले. काही रिक्षाचालकांनी पाणी तुंबल्यामुळे रिक्षा बंद ठेवल्या. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालयासमोरील रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला.

महापालिकेने नालेसफाई झाली असल्याचा दावा वारंवार केला असला तरी उमेशनगर, देवीचा चौक या भागातील गटारं तुंबलेलीच असल्याचं स्पष्ट झालं. स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, “दर वर्षी याच समस्या! पालिका फक्त कागदोपत्री तयारी करते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0