Chhatrapati Sambhajinagar News : ‘सहा कोटीचा दरोडा’ प्रकरणातील मास्टरमाइंड अमोल खोतकर पोलिस चकमकीत ठार!

Amol Khotkar Encounter : अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा थरारक पाठलाग अन् गोळीबार. सहा कोटींच्या दरोड्यानंतर महिन्याभराने तपासात नाट्यमय ट्विस्ट
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर हादरवणाऱ्या ‘सहा कोटी दरोडा’ प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे. या दरोड्याचा मास्टरमाइंड अमोल खोतकर काल रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात झालेल्या पोलिस चकमकीत ठार झाला. एकीकडे दरोड्यानंतर पसार असलेला अमोल खोतकर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता, तर दुसरीकडे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण होतं. पण काल रात्रीचा क्षण थरारक ठरला.
पोलिसांनी गुप्त माहितीनुसार सापळा रचताच, अमोलने थेट पोलिसांच्या दिशेने आपली चारचाकी भरधाव नेली. थांबण्याऐवजी त्याने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबारही सुरू केला. काही क्षणातच परिसरात गोळ्यांचा वर्षाव झाला. अखेर पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात अमोल खोतकर जागीच ठार झाला.
ही घटना उघडकीस येताच, वाळूजसह शहरभरात खळबळ उडाली. पोलिसांकडून अजून अधिकृत माहिती देण्यास संयम राखला जात असला, तरी अमोलच्या मृत्यूनंतर ‘सहा कोटी दरोडा’ प्रकरणातील अनेक गुपितं उलगडण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यात तब्बल 6 कोटींचा ऐवज चोरीला गेला होता. गुन्हे शाखेने आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असली, तरी खरा सूत्रधार अमोल खोतकरच होता. त्याच्या हातून अनेक धागेदोरे उलगडले असते, असं पोलिस वर्तुळातील चर्चेने संकेत दिला आहे.



