Maharashtra Politics : “ठाकरे गटाला नवा धक्का!” — माजी नगरसेविका सुजाता सानप शिंदे गटात, कुलाबा प्रभागात नवा रंगतदार राजकीय खेळ

“धनुष्यबाण गहाण टाकणारे आम्ही नाही”, शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात
मुंबई :-; मुंबई महापालिकेच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा नाट्यमय वळण! कुलाबा प्रभागातील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचा राजीनामा देत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जोरदार प्रवेश केला. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ‘बाहेरून छोटी पण आतून मोठी’ राजकीय हालचाल मानली जात आहे.
सानप यांचा प्रवेश अचानक झालेला नसून त्यामागे ठोस गणित आणि बळकट नेटवर्क आहे. यावेळी त्यांचे दीर आणि माजी नगरसेवक गणेश सानप, तसेच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि इतर पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गणेश सानप हे बेस्ट समितीचे माजी सदस्य असून, त्यांच्या स्थानिक राजकीय पकडीत सत्ताधारी गटाला नवा शस्त्रसज्ज वारं मिळालाय. सुजाता सानप या स्थायी समितीत सक्रीय होत्या. या दोघांचा प्रवेश म्हणजे कुलाबा भागात ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे.
शिंदे यांची टीका — ‘शिवसेना आमची खरी!’
पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या शैलीत आक्रमक पवित्रा घेत, “शिवसेना आम्हीच चालवत आहोत, धनुष्यबाण गहाण टाकणारे आम्ही नाही. जनतेने आमचा विचार स्वीकारला,” अशी टीका केली. त्यांच्या वक्तव्यात आत्मविश्वास होता आणि ठाकरे गटासाठी सूचक इशाराही.
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा पक्षांतराचा ओघ वाढतोय. या हालचाली ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरणार हे निश्चित!


