मुंबई

Alibaug Bribe News : मंडळ अधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात

•रायगड : मंडळ अधिकारी व तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, पाच हजार रुपयांची मागितली लाच

अलिबाग :- जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्याकरिता अलिबाग तालुक्यातील चौल मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर (वय 57) व रेवदंडा तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ (57 वय) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना बुधवारी (ता. 7) रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेची जमीन मौजे आगरकोट, रेवदंडा, तालुका अलिबाग येथे असून त्या जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदार दिनांक 5 मे 2025 रोजी चौल मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर आणि तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी दोघांनीही सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये, असे एकूण 10,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने 6 मे रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने विभागाच्या पथकाने 6 मे रोजी पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 7 मे रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदाराकडून मागणी केलेली पाच हजार रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर त्या कार्यालयातून निघण्याच्या तयारीत असताना तक्रारदाराच्या इशाऱ्यावरून त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.दुसरीकडे, मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी स्वतःसाठी मागितलेली पाच हजार रुपयांची लाच नंतर आणण्याचा संकेत दिला होता. त्यांनीही लाचेची मागणी केल्यामुळे त्यांनाही पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुषमा राऊळ आणि सागर पाटील यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0