Pune Rape News Update : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फरार घोषित, पोलिसांकडून एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर

•दत्तात्रय गाडे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव असून पोलिसांकडून आरोपीचा शोध, तसेच आरोपीला पोलिसांनी फरार घोषित केले आहे
पुणे :- स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्यभरात तिखट पडसाद उमटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून बस आगारच्या सुरक्षारक्षकांचे केबिन याची तोडफोड करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले आहे. या संपूर्ण घटनेनंतर पुणे पोलिसांनी आता कठोर पावले उचलून आरोपीला फरार घोषित केले आहे. तसेच, आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयाचे बक्षीस ही पोलिसांनी जाहीर केले आहे. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आत्तापर्यंत त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीची पोलीस चौकशी करत आहे.


दत्तात्रय गाडेवर 1 लाखाचे बक्षीस फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलिस ठाण्याशी किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट यांच्याकडून देण्यात आली आहे. आरोपीबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते. यादरम्यान पीडितेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला. आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली आहे. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.